Main Featured

राहुल गांधींची भाजपवर थेट टीका


राहुल गांधी (फाईल फोटो)राजस्थानात सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान (Rajasthan Political Crisis) काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी रात्री भारतीय जनता पक्षावर (BJP) थेट हल्लाबोल केलाय. त्यांनी भाजपवर राजस्थानातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा राजस्थानच्या जनतेचा अपमान असल्याचं म्हटलंय.

राहुल गांधींचं ट्विट

'देशात संविधान आणि कायद्याचं शासन आहे. सरकार जनतेच्या बहुमतानं बनतं आणि चालतं... राजस्थान सरकार पाडण्याचं भाजपचं षडयंत्र स्पष्ट झालंय. हा राजस्थानच्या आठ कोटी लोकांचा अपमान आहे. राज्यपाल महोदयांना विधासभा सत्र बोलवायला हवं त्यामुळे सत्य देशासमोर येऊ शकेल' असं ट्विट शुक्रवारी रात्री उशिरा राहुल गांधी यांनी केलंय.

सचिन पायलट गटाला दिलासा

दरम्यान, राजस्थान उच्च न्यायालयाने बंडखोर सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखालील आमदारांविरुद्ध विधानसभा अध्यक्षांनी तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालय कोणती भूमिका घेते? याकडे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे शुक्रवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकारसमर्थक आमदारांनी जयपूरच्या राजभवनात जाऊन राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याचा आग्रह धरला. राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलविण्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राजस्थानचा पेच संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

अशोक गेहलोत यांच्याकडे बहुमताचा आकडा?

गहलोत यांच्याकडे सध्या काँग्रेसच्या १०७ पैकी ८८ आमदार असून, त्यांना १० अपक्ष, २ बीटीपी तसेच रालोद आणि माकपच्या प्रत्येकी एका आमदाराचा पाठिंबा आहे. दोनशे सदस्यांच्या विधानसभेत गहलोत यांच्यापाशी सध्या १०२ आमदारांच्या समर्थनासह आवश्यक बहुमत आहे. पायलट यांच्याकडे सध्या १९ आमदार आहेत.