Main Featured

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्पितळ हे पूर्ण क्षमतेने सुरु करुन नागरिकांना आरोग्यसेवा द्यावी : शशांक बावचकरकोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे विलगीकरण रुग्णालय करण्यात आले आहे. त्यातच कोरोनाच्या भितीने शहरातील खाजगी दवाखानेही बंद असल्याने नागरिकांना अन्य आजारावरील उपचार मिळणे कठीण बनले आहे. त्यासाठी नगरपरिषदेच्या मालकीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्पितळ हे पूर्ण क्षमतेने सुरु करुन नागरिकांना आरोग्यसेवा द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजीतील बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास कोविड-19 विलगीकरण रुग्णालय म्हणून मान्यता देत त्याठिकाणी केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खाजगी दवाखानेही बंद असल्याने शहर व परिसरातील नागरिकांना कोविड वगळता अन्य आजारांवर उपचार मिळणे कठीण बनले आहे. तर आयजीएममध्ये जाणे असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब नागरीकांचे आरोग्य सुविधेविना आतोनात हाल होत आहेत. नगरपरिषदेच्या मालकीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्पितळातील बाह्यरुग्ण विभाग चालू असला तरी तो सक्षमपणे चालू नाही. त्याच इमारतीत कोर्ट विभाग सुरु असलेने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे इस्पितळाची वेळ सकाळी 7.30 ते 10.30 अशी करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागाचा लाभ नागरिकांना घेता येत नाही. त्यामुळे न्यायालयाला विनंती करुन बाह्यरुग्ण विभागाची वेळ वाढवून घेण्यासह त्याठिकाणी कंत्राटी पध्दतीने आणखी दोन डॉक्टरांची नेमणूक व औषधांची उपलब्धता करुन देऊन डॉ. आंबेडकर इस्पितळाचा बाह्यरुग्ण विभाग सक्षमपणे चालविण्यात यावा, असे बावचकर यांनी म्हटले आहे.