करोना विषाणूचा (#corona)संसर्ग रोखण्यासाठी सध्या लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सहाजिकच या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर सारं काही बंद आहे. या टाळेबंदीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला असून कलाविश्वावरही त्याचा परिणाम झाला आहे. 

या काळात चित्रपगृह बंद असल्यामुळे अनेक चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. म्हणूनच अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात म्हणजे २४ ते ३१ या तारखेदरम्यान तब्बल पाच नवे बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput)याचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara)या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सुशांतसह अभिनेत्री संजना सांघी मुख्य भूमिकेत झळकली आहे.बहुप्रतिक्षीत ठरलेला हा चित्रपट २४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजता डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
  1. ‘गोलमाल 3',’कलियुग’ या सारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता कुणाल खेमू लवकरच ‘लुटकेस’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात कुणालसोबत रसिका दुगल, रणवीर शौरी, विजय राज हे कलाकार झळकणार आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
    1. नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘रात अकेली है’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. क्राईम मिस्ट्री प्रकारातील या चित्रपटात नवाजुद्दीन आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.या चित्रपटात स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धूलिया, पद्मावती राव, शिवानी रघुवंशी असे दर्जेदार कलाकार झळकणार असून हा चित्रपट ३१ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
      1. अॅक्शन सीनचा भरणा असलेला यारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिग्मांशू धूलिया दिग्दर्शित हा चित्रपट गुन्हेगारी विश्वावर आधारित असून अभिनेता विद्युत जामवाल आणि अमित साध मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
        हा चित्रपट झी 5 वर ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रसिद्ध गणितज्ञ 'शकुंतला देवी' यांच्या जीवनावर आधारित शकुंतला देवी (Shakuntala Devi)हा चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.शकुंतला देवी या चित्रपटातून प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.