Main Featured

गृहरक्षक दलाचा जवान व पोलिस हवालदारास शिवीगाळ केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी केले एकास अटक


बॅरिकेटस् हाताने आपटण्यास विरोध करणार्‍या गृहरक्षक दलाचा जवान व पोलिस हवालदारास सिमेंटची वीट घेऊन अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी एकास अटक केली. सतिश भगवान पोळ (वय 32 रा. ढोर गल्ली चांदणी चौक) असे त्याचे नांव आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली याबाबतची फिर्याद जय दिलीप बागडे या गृहरक्षक दलाच्या जवानाने दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या काळात संचारबंदी असताना सतिश पोळ याने चांदणी चौक परिसरात उघड्या अवस्थेत येऊन नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने पोलिस बॅरिकेटस् जोराने आपटले. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या गृहरक्षक दलाचा जवान जय बागडे व पोलिस हवालदार दीपक पाटील यांनी पोळ याला अडविले. त्यावेळी पोळ हा सिमेंटची वीट घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. तसेच दोघांना शिवीगाळ केली. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.