Main Featured

इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे निधन



इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्षा इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे (वय – ८७) यांचे आज (शनिवार) दुपारी १२.१५ वाजता इचलकरंजी येथे त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी खासदार माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या त्या पत्नी होत. तर राज्याचे माजी वस्त्रोद्योग मंत्री विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या त्या आई होत.
चिकोडी तालुक्यातील भोज हे त्यांचे जन्मगाव. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या इचलकरंजीत आल्या . कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या राजकीय, सामाजिक, सहकार वाटचालीत त्यांनी मोठे सहकार्य केले. देशातील पहिल्या इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणीच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या. या सूतगिरणीच्या उभारणीत त्यांची मोलाची कामगिरी होती.
त्यांच्या पश्चात पती कल्लाप्पाण्णा आवाडे, मुलगा प्रकाश आवाडे, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, स्नुषा इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, नातू कल्लाप्पांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे. दुपारी तीन वाजता निवास्थापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंदुमती आवाडे या धार्मिक स्वभावाच्या होत्या. सामाजिक कार्याचीही त्यांना आवड होती. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.