Main Featured

ICC स्पर्धेतील विश्वविक्रमी कर्णधार MSD च्या अनलकी कामगिरीवर एक नजर...


MSDhoni, Cricketमहेंद्रसिंह धोनीने एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून क्रिकेटच्या मैदानात एक वेगळी छाप सोडली आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसह टी-20 आणि मर्यादीत षटकांची विश्वचषक स्पर्धा आपल्या संघाला जिंकून देणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव कर्णधार आहे. आपल्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या तीन ट्रॉफ्या संघाला जिंकून देणाऱ्या यशस्वी कर्णधाराच्या नावे असे तीन विक्रम आहेत जे त्याच्या चाहत्यासह त्यालाही नकोसे वाटतील. नजर टाकूयात लकी कर्णधाराच्या कारकिर्दीतील अनलकी वाटावी अशा कामगिरीवर... 
 
सातत्यपूर्ण 4 कसोटी मालिकेत ओढावलेली पराभवाची नामुष्की
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यातच नव्हे तर कसोटी सामन्यातही आपला दबदबा दाखवून दिलाय. कसोटीमध्ये भारतीय संघाला अव्वलस्थान मिळवून देणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघावर सलग चार कसोटी मालिका गमावण्याच्या खराब कामगिरीची नोंद आहे.  2013 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर  1-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता.  2014 मध्ये न्यूझीलंडने भारताला 1-0 असा पराभवाचा धक्का दिला. याच वर्षी इंग्लंडने भारताला 3-1 आणि आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. 
बांगलादेशविरुद्ध मालिका गमावणारा पहिला कर्णधार
भारतीय संघाने 2015 मध्ये बांगलादेशचा दौरा केला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला बांगलादेशने दणका दिला होता. एकदिवसीय सामन्यात बांगलादेशकडून सलग दोन पराभवास भारतीय संघाने मालिका गमावली होती.  पहिल्या एकदिवसीय सामन्यात 79 धावांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 6 गडी राखून धुव्वा उडवत मालिका जिंकली होती. बांगलादेशविरुद्ध मालिका गमावणारा धोनी पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.  
आशिया बाहेरील मैदानात शतकी खेळी करण्यात अपयशी 
यष्टीमागे चपळ क्षेत्ररक्षण आणि नेतृत्वाची अनोखी झलक दाखवून देणाऱ्या धोनीकडे मोठी खेळी करण्याची क्षमता होती. फिनिशिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीयमध्ये 10 आणि कसोटीमध्ये 6 अशी एकूण 16 शतके लगावली आहेत. पण ही सर्व शतके ही आशिया खंडातील मैदानात आहेत. आशिया खंडाच्या बाहेर त्याच्या नावे एकाही शतकाची नोंद नाही. इंग्लंडमध्ये 2019 च्या  विश्वचषकामधील सेमीफायनलमध्ये तो अखेरचा सामना खेळलाय. सध्याच्या परिस्थितीत तो हा कारनामा करु शकेल, असे वाटत नाही.