Main Featured

आयजीएमची बदनामी करणार्‍यांमध्ये रुग्णालयाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचाच सहभाग : आम. प्रकाश आवाडे



कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांवर तातडीने उपचार मिळत असताना असंतोषी मंडळींकडून सोशल मिडीयावर रुग्णालय संदर्भात खोटी माहिती पसरवून नाहक बदनामी केली जात आहे. त्यामध्ये रुग्णालयाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचाच सहभाग असल्याचा सणसणीत आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. तर रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक यांच्या कार्यपध्दतीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत त्यांची चांगलीच कानउघडणी करताना त्यांना हटविण्याचीही मागणी केली. दरम्यान, आमदार आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची विचारपूस करुन माहिती घेता रुग्णांनी मिळणार्‍या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे रुग्णालयाची नाहक बदनामी करुन रुग्णांचे मनोबल बिघडवण्याचा प्रयत्न कदापि खपवून घेतला जाणार नसल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय संदर्भात सोशल मिडीयावरुन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याची शहानिशा करुन माहिती घेण्यासाठी आमदार आवाडे यांनी बुधवारी अचानकपणे रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतानाच रुग्णालयात मिळणार्‍या सुविधांबद्दल विचारपूस केली. त्यावेळी रुग्णांनी मिळणार्‍या सेवांबद्दल समाधान व्यक्त करत कसल्याही तक्रारी नसल्याचे सांगितले. यावेळी रुग्णालयात तातडीने गरम पाण्याची व्यवस्था करुन देण्याच्या सूचनाही आमदार आवाडे यांनी केल्या.



कोरोना महामारीच्या संकटात आयजीएम मध्ये चांगल्या सुविधा दिल्या जात असताना काही दिवसांपासून काही विघ्नसंतोषी रुग्णालयाची नाहक बदनामी करत आहेत. सध्या याठिकाणी आवश्यक बेडची व्यवस्था असून 30 स्पेशल रुममध्ये ऑक्सिजनसह अतिदक्षता विभागात लागणार्‍या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पण काहीजण रुग्णांचे मनोबल वाढविण्याऐवजी ते बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न त्यांनी थांबवावा, असे आमदार आवाडे म्हणाले.
त्यानंतर आमदार आवाडे यांनी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक यांच्याशी चर्चा करताना कोविड रुग्णांवर उपचारासाठी वॉर्डमधील अनेक बेड रिकामे असताना नवीन येणार्‍या रुग्णांना बेड नसल्याचे सांगून पाठविले जात असल्याबद्दल जाब विचारला. त्याचबरोबर पूर्वीच्या आयजीएम कडील 42 वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांचा स्टाफ सेवेत येण्यास तयार आहेत. त्यांचा प्रलंबित प्रश्‍न आपण निश्‍चितपणे मार्गी लावू असे सांगत त्यांना रुजू करुन घ्यावे असे सांगितले. परंतु डॉ. शेट्ये यांनी संबंधित 42 जणांचा स्टाफ भरुन घेण्यास स्पष्टपणे नकार दर्शविला. त्यांच्या या नकारात्मक भूमिकेमुळे संतापलेल्या आमदार आवाडे यांनी शेट्ये यांना धारेवर धरत त्यांची कानउघडणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशीसुध्दा संपर्क साधून त्यांना संबंधित कर्मचारी व रुग्णालयाच्या परिस्थितीसंदर्भात माहिती देत शेट्ये यांना तेथून तातडीने बदलण्याचीही मागणी आमदार आवाडे यांनी केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचेकडून संबंधित 42 जणांना सेवेत सामावून घेण्याचे लेखी आदेश रुग्णालयास प्राप्त झाले.