Main Featured

माजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधन


Former MLA Madhukar Kamble passes away | माजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधनजतचे माजी आमदार मधुकर कांबळे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
१९९५ मध्ये जत विधानसभा मतदारसंघातून मधुकर कांबळे अपक्ष उमेदवारीवर आमदार म्हणून निवडून आले होते. वयाच्या २९ व्या वर्षी ते आमदार झाले होते. निवडून आल्यावर त्यांनी तत्कालीन शिवसेना-भाजपा युतीला समर्थन दिले होते. त्यांच्या आमदारकीच्या काळातच म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या कामाची सुरुवात झाली होती.
त्यावेळी सांगली जिल्ह्यात पाच अपक्ष आमदार निवडून आले होते, या सर्वांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता. युतीने ताकारी - म्हैसाळ जलसिंचन योजना सुरू करून दुष्काळी जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग, आटपाडी, खानापूर, तासगाव पूर्व भागाला पाणी द्यावे अशी आग्रही मागणी त्यावेळच्या अपक्ष आमदारांनी केली, त्यात माजी आमदार मधुकर कांबळे यांची भूमिकाही महत्त्वाची होती. शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळातच ताकारी आणि म्हैसाळ जलसिंचन योजनेची सुरुवात झाली होती.
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सलग दोन वेळा आमदार असणाऱ्या उमाजी सनमडीकर यांचा मधुकर कांबळे यांनी आश्चर्यकारकरित्या पराभव केला होता. काँग्रेसमधील तत्कालीन नाराज नेत्यांनी एकत्र येऊन उमाजी सनमडीकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. श्रीमंत डफळे सरकार, विलासराव जगताप, सुरेश शिंदे यांनी मधुकर कांबळे यांना पाठिंबा दिला होता. अपक्ष लढणाऱ्या मधुकर कांबळे यांनी सनमडीकर यांचा पराभव केला होता.