Main Featured

अखेर जिल्हा परिषदेतील बदल्यांचा पेच सुटला


Finally, the issue of transfers in the Zilla Parishad was resolved | अखेर जिल्हा परिषदेतील बदल्यांचा पेच सुटलाजिल्हा परिषदेतील वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश सरकारने दिले. आहेत. परंतु, प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची टक्के किती राहणार हे स्पष्ट नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. हा पेच सुटल्याने गुरूवारी चार विभागातील २२१ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये १३८ कर्मचारी प्रशासकीय तर ४३ कर्मचारी विनंती बदलीस पात्र ठरले. वेळापत्रकानुसार रविवारीपर्यंत बदली प्रक्रियेची कार्यवाही आटोपती घेवून राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.
ग्रामविकास विभागाने समुपदेशनाने जिल्हा अंतर्गत वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रशासकीय व विनंती बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्याचे निर्देश संबंधित ११ विभाग प्रमुखांना दिले. विनंतीवरून बदली करून घेण्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांकडून प्रस्तावही मागविण्यात आले. २३ ते २६ जुलै रोजी समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्याचे वेळापत्रक जाहीर झाले. प्रशासकीय व विनंती या श्रेणीत किती टक्के बदल्या करायचे हे बुधवारपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे बदलीला पात्र असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम होता. दरवर्षी २० टक्के बदल्या केल्या जातात. त्यात प्रशासकीय आणि विनंतीवरून प्रत्येकी दहा टक्के बदल्या होतात. राज्य शासनाने कोरोनामुळे यंदा या निकषात बदल केला. मात्र, त्यासंदर्भात आदेश न पोहोचल्याने जि.प.मध्ये गुरूवारी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी गोंधळाचे वातावरण होते. समुदेशनाने बदल्या झाल्याने या प्रक्रियेबाबत कर्मचाºयांची नाराजी दर्शविली नाही, हे विशेष.

१५ टक्क्यांमुळे काहींचा हिरमोड
प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया राबविण्यासाठी जि. प. च्या कन्नमवार सभागृहात सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवस्था करण्यात आली. पात्र असलेल्या विविध संवर्गातील वर्ग ३ मधील कर्मचारी बदलीसाठी समुपदेश प्रक्रियेला सामोरे जात आहेत. बदलीची टक्केवारी घटविल्याने गुरूवारी पहिल्या दिवशी झालेल्या प्रक्रियेत काही कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

विनंतीवरून चार विभागात ८३ बदल्या
चंद्रपूर जिल्हा परिषदेने १० टक्के प्रशासकीय तर पाच टक्के विनंतीवरून बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरूवारी शिक्षण, कृषी, बांधकाम आणि वित्त विभागातील ४० बदल्या प्रशासकीय तर ८३ बदल्या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ११ विभागातून प्रशासकीय बदलीसाठी सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती.

२८ जुलैपासून पं.स.मध्ये बदली प्रक्रिया
जिल्हा परिषदेतील बदल्या आटोपल्यानंतर पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरावरील समुपदेशन बदली प्रक्रिया २८ जुलैपासून सुरू करण्याच्या निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. राज्य शासनाने ३१ जुलै २०२० पर्यंत बदल्यांसाठी दिलेली मुदत १० आॅगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जि. प. चे प्रयत्न सुरू आहेत.