Main Featured

कोरोना संकटकाळात आरोग्यसेवेसाठी वैद्यकिय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची अत्यंत गरज.कोरोना महामारीच्या संकटकाळात आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकिय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे या संकटकाळात मागील दीड वर्षापासून आरोग्य विभागाकडे समावेशनाच्या प्रतिक्षेत असलेले पूर्वीचे ‘आयजीएम’कडील 42 जणांनी सेवेत रुजू व्हावे. त्यांच्या समावेशनासह अन्य प्रलंबित प्रश्‍न आपण लवकर निश्‍चितपणे मार्गी लावू अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार आवाडे यांनी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी, कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत संबंधित 42 कर्मचार्‍यांना इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयाकडे तात्काळ हजर करून घ्यावे, असे लेखी आदेश रुग्णालयास दिले आहे. इचलकरंजी नगरपरिषदेच्या मालकीची इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) चार वर्षापूर्वी शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे.


त्यावेळी आयजीएमकडील वैद्यकीय आणि इतर 70 कर्मचार्यांचे समावेशन आरोग्य विभागाकडे करण्यात आले. परंतु अद्यापही 42 जणांचे समावेशन झालेले नाही. त्यामध्ये 3 वैद्यकीय अधिकारी, 32 स्टाफ नर्स, 2 फार्मासिस्ट, 2 एक्स-रे टेक्निशियन, 2 लॅब टेक्निशियन, 1 फिजीओथेरिपिस्ट यांचा समावेश आहे. परिणामी मागील दीड वर्षांपासून ते कर्मचारी सेवेबाहेर आहेत. सध्या इचलकरंजीसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून कोविड विलगीकरण रुग्णालय झालेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात स्टाफ अपुरा पडत आहे. त्यामुळे त्या 42 जणांनी अशा संकटसमयी आरोग्यसेवेत रुजू व्हावे या संदर्भात आमदार आवाडे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान त्यांचे प्रश्‍न, अडचणी जाणून घेतल्या.
त्यानंतर आमदार आवाडे म्हणाले, या 42 जणांच्या समावेशन संदर्भात नगरविकास विभागाने 2 फेब्रुवारी 2019 रोजी निर्णय घेतला असून अद्याप त्यांचे सार्वजनिक आरोग्य विभागात समावेशन झालेले नाही. या प्रश्‍नी आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांच्या समावेशनासाठी आरोग्य मंत्रालयाची परवानगी असून सामान्य प्रशासन विभागाचा आदेश निघणे बाकी असल्यामुळे लवकरच हा प्रश्‍नी मार्गी लागेल. ते 42 जणही आरोग्यसेवा देण्यास तयार आहेत. त्यामुळे हे 42 जण इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सेवा देण्यास रुजू होतील, असे सांगितले.