Main Featured

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 471 इतकी


महिन्याभरापासून वस्त्रनगरीत सुरु असलेली कोरोनाची श्रृंखला तुटता तुटेनाशी झाली आहे. दिवसागणिक वाढत चाललेल्या श्रृंखलेने 400 चा टप्पा ओलांडला असून बुधवारी दिवसभरात 40 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये एका महिला डॉक्टरासह नगरसेवकांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 471 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे शहरातील भोनेमाळ परिसरातील एका 72 वर्षीय वृध्दा, कारंडे मळा परिसरातील महिला आणि मंगळवारपेठ परिसरातील 75 वर्षीय वृध्द यासह अन्य एकजण अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवडा हा इचलकरंजीसाठी अत्यंत धोकादायक असाच ठरला. या आठवडाभरात तब्बल 200 रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणाही हडबडून गेली. तर शहरवासियांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली असताना कोविड सेंटरमध्ये जागा अपुरी पडू लागल्याने बाधितांसह त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होऊ लागली आहे.

बुधवारी सकाळच्या सत्रात प्राप्त अहवालात 14 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये पाटील मळ्यातील एकाच कुटुंबातील 6 जणांसह 8 जणांचा समावेश आहे. तर शाहू कॉर्नर, लायकर गल्ली, थोरात चौक आदी परिसरात रुग्ण मिळून आले. शहरात महिन्याभरापासून सुरु असलेली ही कोरोनाची शृंखला अखंडीतपणे सुरु असून दररोज दोन अंकी संख्येची भर पडत चालली आहे.
बुधवारी सायंकाळपर्यंत एक शासकीय महिला डॉक्टर, पाटील मळ्यातील एकाच कुटुंबातील सहा, नगरपरिषदेच्या बाधित पदाधिकार्‍याच्या कुटुंबातील सहा तर थोरात चौक आणि लायकर गल्लीतील प्रत्येकी दोघांसह 40 जणांची भर पडली. तर भोनेमाळ येथील संकपाळ गल्लीतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे बाधितांची संख्या 471 वर पोहोचली आहे. शहरातील एकूण बाधितांपैकी आजअखेर 30 जणांचा मृत्यू झाला असून 71 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. तर 374 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत.