Main Featured

अब्दुललाट येथील अवैध मद्यविक्री केंद्रावर छापा; दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील अवैध मद्यविक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत देशी-विदेशी मद्याचा साठा, दोन दुचाकी यासह सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर प्रमोद हरी मिणेकर (वय 48), मनोज हरी मिणेकर (वय 53) आणि सुनिल बाळु घोरपडे (वय 43) या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आठवडाभर कडक निर्बंधासह लॉकडाऊन सुरु आहे. या काळातही शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे अवैधरित्या मद्याची विक्री सुरू असल्याची माहिती येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकून सुमारे 20 लिटर विदेशी तर 80 लिटर देशी, 20 लिटर हातभट्टीची दारू यासह 2 दुचाकी वाहने असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. अवैध मद्यविक्री आणि साठा प्रकरणी प्रमोद मिणेकर, मनोज मिणेकर आणि सुनिल घोरपडे या तिघांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, सागर नलवडे, जी. एच. हजारे, सुनिल पाटील, सतीश कोळी, विलास पवार, सुभाष कोले, विजय माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये अब्दुललाटचे उपसरपंच मिलींद कुरणे, पोलीस पाटील मानसिंग भोसले, बाळासो कोळी सहभागी झाले होते.