Main Featured

कोविड रुग्णालयातच सर्व नियम, निर्बंध धाब्यावर बसवत कोरोनाबाधित मित्राचा वाढदिवस थाटामाटात साजरा


शहरावर कोविडचे महासंकट घोंघावत असताना खुद्द कोविड रुग्णालयातच सर्व नियम, निर्बंध धाब्यावर बसवत कोरोनाबाधित मित्राचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने संपूर्ण शहरात त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. तर या प्रकारानंतरही रुग्णालय प्रशासन गप्प कसे असा सवाल उपस्थित होत आहे. मागील महिन्याभरापासून शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत चालला आहे. इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे महत्वाचे आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे शासनाने हे रुग्णालय कोविड विलगीकरण रुग्णालय म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे याठिकाणी केवळ कोरोनाबाधितांवरच उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे याठिकाणी वावरतानाही काळजी घ्यावी लागते.
असे असताना गुरुवारी रात्री याठिकाणी दाखल असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा त्याच्या काही मित्र व रुग्ण म्हणून दाखल असलेल्यांनी थाटामाटात वाढदिवस साजरा केला. या प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामध्ये कोरोनाला दूर ठेवण्यासाठी असलेल्या नियमांचा पायदळी तुडविल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्स, मास्क न वापरता घातलेला गोंधळ यामुळे दिवसभर चर्चा रंगली होती. मोठ्या प्रमाणात गोंधळात साजरा झालेल्या या प्रकाराची प्रशासनाला काहीच कल्पना कशी नाही. शिवाय या प्रकाराबद्दल काय कारवाई करण्यात आली असे सवाल उपस्थित होत आहेत.