Main Featured

लॉकडाऊन कालावधीतील वेतन मिळावे : कामगार संघटनांची आंदोलनाची हाक


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. अद्याप संपूर्ण उद्योग धंदे सुरू नसल्याने कामगार आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीतील वेतन मिळावे आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार 3 जुलै रोजी येथील प्रांतकार्यासमोर कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्याचा निर्णय लाल बावटा कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत लॉकडाऊनमुळे कामगार अर्थिक संकटात असल्याने लाँकडाऊन काळातील संपूर्ण वेतन मिळावे, केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, आगामी 3 महिने प्रत्येकी 10 किलो धान्य मिळावं, पेन्शनरांना 9 हजार पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा तसंच कोरोना आपत्तीमध्ये यंत्रमाग, प्रोसेस, गारमेंट, सायझिंग आणि बांधकाम कामगारांना महिन्याला साडेसात हजार रुपये मिळावेत, आर्थिक फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली थांबवावी, मनरेगाचे काम खेड्याबरोबरच शहरी भागात सुरू करण्याच्या मागण्यांसाठी 3 जुलै रोजी प्रांतकार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.


या आंदोलनात सिटू, राष्ट्रवादी, श्रमिक, मनसे, आयटक, इंटक, सर्व बांधकाम संघटना, आशा वर्कर, यंत्रमाग, प्रोसेस, गारमेंट कामगार सहभागी होणार आहेत. बैठकीस भरमा कांबळे, दत्ता माने, मदन मुरगुडे, ए.बी. पाटील, आनंदा गुरव, धोंडीबा कुंभार, हणमंत लोहार, रियाज जमादार, शिवानंद पाटील, बंडा सातपुते, शिवाजी भोसले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments