Main Featured

तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक : चौघांना अटक


बंदी घालण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक व साठा केल्याप्रकरणी पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी माजी नगरसेवकासह सहाजणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सुरज हारूण चिक्कोडे (वय 29 रा. बावणे गल्ली), नितेश शंकरलाल अग्रवाल (वय 37 रा. श्रीपादनगर), शिवम अनिल लायकर (वय 25), उमेश अनिल लायकर (वय 29 दोघे रा. षटकोन चौक) यांना अटक करण्यात आली असून राहिल सलीम पटेकरी व जहाँगीर गणी पटेकरी (दोघे रा. जवाहरनगर) हे दोघे फरारी आहेत. या कारवाईत महिंद्रा बोलेरो पिकअप, इंडिका कार, दोन मोटरसायकली, चार मोबाईलसह 16 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी शहर व परिसरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी आणि विक्री होते. लॉकडाऊन काळातही शहरात होणारी गुटख्याची तस्करी कायम असल्याचे अनेक कारवायातून स्पष्ट झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर सोमवारी रात्री उत्तम चित्रमंदिर परिसरातील श्रीपादनगर भागात संशयावरुन बोलेरो पिकअप आणि इंडिका कार पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी अडविली. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा मिळून आला. याचवेळी संबंधित वाहनातील तंबाखूजन्य पदार्थ नेण्यासाठी आलेले दोघे मोटरसायकलस्वारही पोलिसांच्या हाती लागले.


या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी नितेश अग्रवाल व त्याच्या साथीदारांनी हा मुद्देमाल कर्नाटकातील बोरगांव येथून इम्तियाज नामक व्यक्तीकडून आणला असल्याचे सांगितले. हा गुटखा जहाँगिर पटेकरी व राहिल पटेकरी यांच्या सांगण्यावरुन त्यांना देण्यासाठी आणला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या कारवाईत 1 लाख 10 हजार 160 रुपयांचा जाफराणी जर्दा, 5 लाख 83 हजार 440 रुपयांचा मुसाफिर पानमसाला, 16 हजार 128 रूपयांचा टॉप स्टार पानमसाला, 4 हजार 32 रूपयांचा सुगंधी तंबाखु असा 7 लाख 13 हजार 760 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह महिंद्रा बोलेरो पिकअप, टाटा इंडिका कार, दोन होंडा स्प्लेंडर, चार मोबाईल असा एकुण 16 लाख 33 हजार 760 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments